Ad will apear here
Next
मुंबईतील आर्ट डेको वास्तुशैलीचे सौंदर्य
मरीन ड्राइव्ह परिसर

मुंबईतील ओव्हल मैदान आणि मरीन ड्राइव्ह या भागांत ब्रिटिश काळात आर्ट डेको शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. या इमारती बांधताना दीर्घ काळ टिकण्याचा हेतू तर होताच; पण त्यांची रचना करताना सौंदर्यदृष्टी वापरून त्या दीर्घ काळ स्मरणातही राहतील, या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. या शैलीबद्दल विस्तृत माहिती देणारा, ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला हा लेख...
.......
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई शहरासाठी बनवलेला पहिला आराखडा हे आधुनिक नागरी शहर कसे असावे, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे! त्या शाश्वत बदलाचे श्रेय गव्हर्नर सर बार्टल फ्रियरला जाते. त्याने बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ सेंट थॉमस कॅथेड्रल चर्चसमोरील प्रवेशद्वाराच्या जागेवर फ्लोराफाउंटन शिल्प उभे करण्यात आले. नगररचनेचा सखोल अभ्यास असलेल्या ब्रिटिश राजवटीतील प्रगल्भ वास्तुविशारदांच्या कल्पनेतून कला-सौदर्यपूर्ण मुंबईची निर्मिती झाली. नवीन आराखड्यानुसार फोर्टभोवतीची तटबंदी पाडून लगतच्या २२ एकर मोकळ्या जागेत ‘ओव्हल’ आकारात मैदान साकारले गेले. या संपूर्ण परिसराला ‘एस्प्लनेड कोर्ट’ असे म्हणत. 

ओव्हल मैदान (फोटो सौजन्य : मिड डे)

मैदानाच्या पूर्वेकडील रस्त्यालगत गॉथिक शैलीत सार्वजनिक कार्यालयांच्या भव्य आकारातील इमारती व पश्चिमेकडील रस्त्यालगत आर्ट डेको शैलीत निवासी संकुले बांधण्यात आली. विशाल अरबी समुद्राच्या रस्त्यास लागून त्याच शैलीवर आधारित दुसरे निवासी संकुल बांधले गेले. या दोन्ही संकुलांतील निवासी इमारती अल्पकाळ टिकणाऱ्या निवाऱ्यासाठी बांधलेल्या इमारती नसून, पुढील अनेक वर्षे टिकून राहतील इतकेच नव्हे, तर त्या इमारतींची अंतर्बाह्य रचना कला-सौंदर्यपूर्ण शैलीने नटवून त्या अधिक काळ स्मरणात राहाव्यात, अशा दृष्टिकोनातून बांधण्यात आल्या होत्या. शंभर वर्षांहून अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता असलेल्या इमारतींनी हा उद्देश खरा ठरवला आहे. या परिसरातील ओव्हल मैदान हे फोर्ट परिसराचा आत्मा आहे. अरबी समुद्रालगत बांधलेला लांब कठडा मरीन ड्राइव्ह परिसराचे आकर्षण बनून राहिला आहे. जवळपास शतकभरापूर्वी स्थापत्यकलेच्या सौंदर्य दृष्टिकोनातून उभारलेल्या पुरातन मुंबईतील दोन मुख्य परिसरांच्या जडणघडणीतील इमारत शैली, स्थापत्य आणि सौंदर्यपूर्ण रचना यांबाबतची थोडक्यात माहिती आपण घेऊ या.

सन १८६० ते १९१४ या कालावधीत समुद्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून जमीन विस्ताराचे काम करण्यात आले होते. मुंबईच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा बदल होता. त्यानंतर सन १८७१ ते १८७८च्या दरम्यान नवीन आराखड्यानुसार ओव्हल मैदानाच्या पूर्व भागात सरकारी खर्चातून जुने सचिवालय, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, न्यायालय, छत्रपती शिवाजी संग्रहालय, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस व सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसारख्या भव्य आकारातील लक्षवेधी इमारती व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत बांधल्या आहेत. फोर्ट परिसरातील काही इमारतींचे आराखडे ब्रिटिश आर्किटेक्ट जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट व जॉज विटेट यांनी बनविले आहेत. सेंट्रल पोस्ट ऑफिस, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी संग्रहालय इमारतीच्या संरचनेत कमळफुलांच्या पाकळ्यांवरील मध्यवर्ती घुमटाचा आकार विजापूर येथील गोल घुमटावर आधारित आहे. खिडक्या व मार्गिकेतील पसरट सज्जांवर हिंदू, मुघल व जैन वास्तुशैलीतील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुघटकांचा वापर केला आहे.

ब्रिटिशकालीन मुंबई शहराच्या जडणघडणीत केवळ ब्रिटिशांचा नव्हे, तर एतद्देशीयांचाही तितकाच मोलाचा वाटा होता. एतद्देशीय धनिकांनी सामाजिक योगदानातून अनेक इमारती बांधल्या. सर जमशेटजी जजीभॉय यांनी जे. जे. हॉस्पिटल आणि शैक्षणिक कार्यासाठी कलाशाखेशी निगडित जे. जे स्कूल ऑफ आर्ट ही इमारत बांधली. श्री प्रेमचंद रायचंद यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ राजाबाई टॉवरसारखी अप्रतिम इमारत बांधली. अशा अनेक लोकहितवादी श्रीमंतांची नावे या यादीत जोडता येतील. तत्कालीन राज्यकर्त्यांशी अत्यंत सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आणि एतद्देशीयांचे स्फूर्तिस्थान असलेले नाना जगन्नाथ शंकरशेट यांचेही पुरातन मुंबईच्या विकासात फार मोठे योगदान होते, हे विसरून चालणार नाही.



सन १९२० ते १९४०च्या दरम्यान ओव्हल मैदानाच्या पश्चिमेला जगप्रसिद्ध ‘आर्ट डेको’ शैलीत सलग १८ निवासी इमारतींचे संकुल बांधण्यात आले, हे विशेष. या संकुलातील इमारतींचे आराखडे वेगवेगळ्या वास्तुविशारदांनी काही समान घटकांचा कल्पकतेने वापर करून तयार केले आहेत. बाह्यरूपात एकल शैलीचा बाज कायम ठेवण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वरकरणी एकसारख्या भासणाऱ्या इमारती जणू काही एकाच वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकारल्या असाव्यात, असे दिसून येते. ओव्हल मैदानाच्या पूर्वेस व्हिक्टोरियन शैलीतील सार्वजनिक कार्यालये, तर पश्चिम दिशेस ‘आर्ट डेको’ अशा परस्पर विरुद्ध शैलीतील संकुले उभी आहेत. तत्कालीन मुंबई पालिकेच्या जाचक नियमांचे पालन करून व अटींचे उल्लंघन न करता त्यांनी हे काम लीलया साधले आहे, हे दिसून येते. 

निवासी संकुलांसाठी वापरलेल्या ‘आर्ट डेको’ शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये अशी - 
- मानवी दृष्टिकक्षेत मावणाऱ्या एकसमान उंचीतील इमारती. 
- इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील प्रशस्त बल्कनीला दिलेले अर्धगोलाकार वळण.
- पावसापासून भिंतींचे संरक्षण करणारे, त्याच अर्धगोलाकारात वळण घेणारे पसरट सज्जे.
- मध्यवर्ती जिन्याच्या भिंतीवरील खिडक्यांचे आकार व छतावरील कलात्मक गोलाकार आकृतिबंध.
- खिडक्यांना संरक्षणार्थ बसवलेले, पण इमारतीचे अविभाज्य भाग असल्यासारखे भासणारे कलात्मक आकृतिबंधातील नक्षीदार लोखंडी सुरक्षा कवच.
- इमारतीचा फिकट हलका मुलायम रंग.

अर्धगोलाकार बाल्कनी आणि पसरट सज्जे

या खासियतीमुळेच ‘आर्ट डेको’ शैलीने मुंबईतील धनिकांच्या मनात स्थान मिळवले होते. कोर्ट व्ह्यू, इम्प्रेस कोर्ट, ग्रीन फिल्ड अशी नावे परिसरावर वर्चस्व गाजवणाऱ्या कार्यालयांच्या इमारतींना देण्यात आली आहेत. स्थलगौरवाच्या उल्लेखातून शब्दबद्ध केलेली नावेदेखील निरनिराळ्या मोहक लिपीत लिहून ती सहजपणे नजरेस येतील, अशा समान उंचीवर लावली आहेत. संकुलातील निवासी इमारती व चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील इरॉस सिनेमागृहाची इमारत वास्तुकला-सौंदर्याच्या कसोटीवर पुरेपूर उतरते. अनेक वर्षांच्या फरकाने एकाच शैलीत विकसित झालेले हे दोन्ही परिसर खऱ्या अर्थाने मुंबईची शान आहेत. हा गौरवशाली वारसा आणि वैभव अनेक वर्षे टिकवून ठेवण्यात परिसरातील रहिवाशांचा खूप मोठा सहभाग आहे. तो पुढील काळातही टिकून राहील यात शंका नाही. दोन्ही आर्ट डेको संकुलातील अनेक इमारतींचे आराखडे जी. बी. म्हात्रे व ग्रेगसन बॅटले या भारतीय वास्तुविशारदांनी बनवले होते. 



वरील निरीक्षणातून असे लक्षात येते, की कोणत्याही घटकाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे असतात. हे दोन्ही परिसर मानवी कल्पना व नैसर्गिक पार्श्वभूमीचा पुरेपूर लाभ घेऊन घडवलेले आहेत. त्या जागेत उभ्या असलेल्या इमारतींच्या सौंदर्याची कल्पना आणि व्याख्या जरी प्रत्येक व्यक्तिगणिक बदलण्याची शक्यता असली, तरी त्यातील काही घटक सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ओव्हल मैदानालगतच्या महर्षी कर्वे रोडवरील कोणताही मोसमातील प्रसन्न व शांत वातावरण पाहून, काही काळ का होईना, आपले भान हरपून जाते. आपल्या जाणिवा तल्लख होतात. शहररचनेतील एकूण सौंदर्य आपण गृहीत धरत नाही. त्यामुळे आपली फसगत होते. दक्षिण मुंबईतील इमारत स्थापत्य, शैली व कला-सौंदर्यपूर्ण नजरेतून बनवलेल्या ब्रिटिशकालीन आराखड्यातील प्रमाणबद्ध रचना व सौंदर्य जाणून घेण्यासाठी संवेदनशील सौंदर्यदृष्टी हवी. तरच त्या दृश्यातील विविध घटकांची जाणीव आपणास होऊ शकते. हे सर्व पाहताना आपला जगण्यातील आनंद शतपटीने वाढतो, हे लेखकाने अनुभवले आहे! 

चर्चगेट रेल्वे स्टेशनपासून साधारण ४०० मीटर अंतरावर असलेल्या मरीन ड्राइव्ह येथील निसर्गसान्निध्यातील परिसराचा देखावा ओव्हल मैदानापेक्षा निराळा आहे. 

रात्रीच्या वेळी मरीन ड्राइव्ह परिसर राणीच्या चंद्रहाराप्रमाणे दिसतो.

मरीन ड्राइव्ह परिसराची काही वैशिष्ट्ये :
- ‘आर्ट डेको’ शैलीतील सलग २६ निवासी व व्यावसायिक इमारतींचे मिश्र संकुल.
- आठपदरी दुतर्फा रस्ता. दोन्ही बाजूच्या रस्त्यास सोबत करणारा ऐसपैस, मोकळा व अपरंपरागत आकारातील पदपथ. 
- फिकट निळ्या रंगाची शाल पांघरलेला विशाल अरबी समुद्र 
- रस्ता, पदपथ व समुद्री लाटांना अडवणारा ४.२ किलोमीटर लांबीचा ऐसपैस, रुंद दगडी कठडा.
- रौद्र किंवा सौम्य समुद्री लाटांना थोपण्यासाठी ठेवलेले अगणित टेट्रापॉड 
- रात्री सोडियम दिव्याच्या पिवळसर सोनेरी प्रकाशात उजळून निघणारा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूभाग राणीच्या चंद्रहाराप्रमाणे (क्वीन्स नेकलेस) दिसतो.

ऐसपैस पदपथ, कठडा, लाटा रोखणारे टेट्रापॉड्स आणि समुद्र

‘आर्ट डेको’ शैलीतील इमारतींचे संकुल असलेले मियामीनंतर मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. मरीन ड्राइव्ह परिसराचा आनंद घेण्यास आलेल्या सर्व वयोगटातील मित्रपरिवाराला विशाल समुद्री लाटांच्या नादात अडकवून ठेवून, ऊन, थंडी व पावसाळ्यातील ओलसरपणा विसरण्यास लावणारा कठडा आपलासा वाटतो. ऐसपैस पहुडलेले अगणित टेट्रापॉड असंख्य पाहुण्यांचे मित्र असल्यासारखे भासतात. अशा मिश्र कलापूर्ण शैलीतील इमारतींचे सौदर्य व निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात एक प्रकारची मंत्रमुग्ध करणारी अव्यक्त शक्ती आहे. वातावरणात उत्स्फूर्तता व आनंद निर्माण करणारी शहरी जीवनशैली नेमकी कशी असावी, याचा उत्तम नमुना म्हणून या दोन्ही परिसरांचा उल्लेख करता येईल.

निळी शाल पांघरलेला समुद्र

ओव्हल मैदानाच्या पश्चिमेकडील निवासी रहिवाशांना मैदानातील शुद्ध हवा व जगप्रसिद्ध गॉथिक शैलीतील निरनिराळ्या आकारात बनवलेल्या इमारतींच्या छतावरील आकाशरेषेतील पार्श्वभूमीवर उगवत्या सूर्यदर्शनाचा आनंद घेता येतो. मरीन ड्राइव्ह परिसरातील रहिवाशांना पश्चिमेकडील अथांग सागरात हळूहळू विलीन होत जाणाऱ्या सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. या दोन आनंदांपैकी कोणता आनंद अधिक मंत्रमुग्ध करणारा आहे, हे सांगणे कठीण आहे! ही दोन्ही दृश्ये सर्व स्तरांतील नागरिकांना आकर्षित करणारी व कलासक्त मनास उल्हसित करणारी आहेत. म्हणूनच हा परिसर स्थानिक नागरिक व देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या दोन्ही परिसरांपैकी ओव्हल परिसर घडवण्यात मानवी स्पर्श, तर दुसऱ्या परिसराला मानवी स्पर्शासोबत सागरी सौंदर्याची साथ लाभली आहे. या दोन्ही परिसरांत स्थापत्यकला व निसर्गसौंदर्याचा उत्तम मिलाफ साधला गेला आहे. या दोन परिसरांपैकी एका परिसराची निवड करायची झाली, तर माझी निवड मरीन ड्राइव्हऐवजी ओव्हल मैदान असेल. कारण माझ्या मते तो आव्हानात्मक व आकर्षक परिसर आहे.

मरीन ड्राइव्हवरील पावसाळी आनंद

अत्याधुनिक व अति प्रगत समजल्या जाणाऱ्या वर्तमान युगात अनेक जटिल समस्यांनी घेरलेल्या मुंबईसारख्या महानगराचा कृती आराखडा फक्त वीस वर्षांचा कार्यकाल गृहीत धरून बनवला जातो, हे धोरण चुकीचे कसे आहे हेच आजतागायत अनुत्तरित राहिलेल्या समस्यांतून दिसून येते! मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवास सुखकर व्हावा म्हणून जवळपास दीडशे वर्षांनंतर वर्तमान शासनाने घेतलेला समांतर सेवा पुरवणारा मोनो, मेट्रो रेलचा निर्णय प्रशंसनीय आहे. विदेशातील अनेक शहरांनी अशा योजनांतून पुरातन वास्तू व पर्यावरण जतनातून अत्याधुनिक विकासाच्या वाटेवर प्रगती केली आहे. लंडन, पॅरिस इत्यादी शहरे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तत्कालीन नगररचनाकारांकडे असलेली दूरदृष्टी व आराखडे कार्यान्वित करणाऱ्या गव्हर्नरांकडे असलेल्या प्रशासकीय निर्णयक्षमतेच्या जवळपासही वर्तमान पुनर्विकास घडवणाऱ्या व्यवस्था पोहोचत नाहीत हे विदारक सत्य आहे! तेव्हा, वर्तमान पुनर्विकास उपयुक्ततावादी (Utilitarian Approach) दृष्टिकोन वापरून साधला, तर तो विकास अधिक अनुरूप ठरेल. त्यामुळेच शहराची ओळख टिकून राहील.

ई-मेल : चंद्रशेखर बुरांडे - fifthwall123@gmail.com

(मुंबईतील काही पुरातन वास्तूंचे सौंदर्य उलगडून दाखवणारे चंद्रशेखर बुरांडे यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मरीन ड्राइव्ह परिसर

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZTKCH
Similar Posts
कलेचा वारसा जपणारा काळा घोडा महोत्सव दक्षिण मुंबईतील कलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या काळा घोडा महोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष आहे. कला, संगीत व स्थापत्य कलेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हा महोत्सव करतो आहे. यंदाचा महोत्सव दोन फेब्रुवारीला सुरू झाला असून, १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘काळा घोडा’ या नावामागचे रहस्य,
वैभवशाली फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य ब्रिटिशकालीन मुंबईत उभारल्या गेलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींपैकीच एक म्हणजे फ्लोरा फाउंटन. १८६९मध्ये सुरू झालेले हे कारंजे अलीकडे काही काळ बंद होते. यंदाच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी या फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य या दृष्टीने घेतलेला हा आढावा
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
केशवजी नाईक फाउंटनचे वास्तुसौंदर्य ‘केशवजी नाईक फाउंटन अँड क्लॉक टॉवर’ ही मुंबईतील एक पुरातन वास्तू आहे. २०१५मध्ये या वास्तूचे पुनरुज्जीवन करण्यात आले. वास्तुसौंदर्याच्या दृष्टिकोनातून या वास्तूची वैशिष्ट्ये उलगडून सांगणारा ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांचा हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language